बीएचआर प्रकरण : आज अटक केलेल्या तिघांना ६ दिवस कोठडी

जून 17, 2021 7:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । बीएचआर प्रकरणात आज सकाळी अटक केलेल्या १२ संशयितांपैकी जयश्री तोतला, अंबादास मानकापे आणि प्रेम नारायण कोगटा या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सरकार पक्षाकडून ॲड.प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तीवाद केला.

bhr incumbent chaitanya nasare will take charge today

बीएचआर घोटाळ्यात आज पहाटे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शहरातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा, प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांना ताब्यात घेतले होते.

अटकेतील या संशयितांपैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोगटा या तिघांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात मांडले की, घोटाळा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या तिघा संशयित आरोपींनी ३० टक्क्याप्रमाणे ठेवीदारांच्या पावत्या विकत घेतल्या. बीएचआर पतसंस्थेत अनेक ठेवीदारांचा कष्टाचा पैसा होता. परंतु आरोपींनी तीस टक्के प्रमाणे पावत्या विकत घेण्यासाठी परिस्थिती निर्माण केली. आणि यातून ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात लुबाडले. अवसायकाचा कारभार पारदर्शी अपेक्षित होता. परंतु त्यांनी देखील पावत्या ३० टक्क्यात विकण्यासाठी ठेवीदारांना मजबूर केले. त्यामुळे तिघांना पोलीस कोठडीत देण्यात यावी, अशी मागणी ॲड. प्रवीण चव्हाण यांनी केली. त्यावर न्यायालयाने तिघा आरोपींना २२ जून म्हणजेच सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

जळगावातून दुपारी पुणे येथे घेऊन गेलेल्या इतर संशयितांना उद्या न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now