जळगाव लाईव्ह न्यूज । मान्सूनने आता आपल्या परतीचा प्रवास सुरू केला असून, १५ ऑक्टोबरपर्यंत तो राज्यभरातून पूर्णपणे माघारी फिरणार आहे. मात्र, जाता-जाता मान्सून जळगाव जिल्ह्यात हजेरी लावण्याच्या तयारीत आहे. हवामान विभागाने आज २४ आणि उद्या २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेष म्हणजे, २५ सप्टेंबरला लाडक्या बाप्पाचे विसर्जन असल्याने या धामधुमीत हवामानाचा हा लहरीपणा विघ्न आणण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून पावसाने मोठी ओढ दिली होती. दुसरीकडे तापमानात वाढ होऊन उकाडा प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे जळगावकर घामाघूम होऊन हैराण झाले आहेत. दरम्यान, काल बुधवारी अनेक दिवसांच्या खंडानंतर शहरात १५ ते २० मिनिटे पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला, तरी त्यानंतर पुन्हा उकाडा वाढल्याने नागरिकांची सुटका झालेली नाही.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचे रूपांतर एका तीव्र चक्राकार स्थितीत झाले आहे. ही प्रणाली सध्या विदर्भाच्या दिशेने वेगाने सरकत आहे. यामुळे जमिनीलगतच्या हवेच्या दाबात अचानक तफावत निर्माण झाली असून, ढगांची निर्मिती वेगवान होऊन जळगाव जिल्ह्यात जमिनीलगत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला असून या काळात कमाल तापमान ३४ अंश, तर किमान तापमान अनुक्रमे २१ आणि २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
२६ सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याचा अंदाज असून, या काळात कमाल तापमान पुन्हा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
विसर्जनाच्या दिवशीच ‘यलो अलर्ट’चे सावट
उद्या २५ सप्टेंबर रोजी सर्वत्र गणपती विसर्जनाचा मोठा उत्साह असणार आहे. मात्र, याच दिवशी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिल्याने प्रशासनाची व नागरिकांची चिंता वाढली आहे. परतीच्या मान्सूनच्या काळात ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची आणि जोरदार वाऱ्यांमुळे विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहावर किंवा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाप्पाला निरोप देताना नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







