जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला असून त्यातच शेतकऱ्यांच्या विहिरीतील केबली चोरी, मोटार चोरीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. याच दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल, शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटारी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे चोरट्ट्यांकडून एक मोटारसायकल आणि तब्बल 29 पाणबुडी मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथून हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांत दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करण्यात आला.

या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित आरोपी सोमनाथ उर्फ लंगडया रघुनाथ निकम (रा. अंधारी, ता. चाळीसगाव), सुधीर नाना निकम (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) आणि सम्राट रविंद्र बागुल (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
सखोल चौकशीत आरोपींनी शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरी करून त्या स्वतःच्या असल्याचे सांगून विकल्याचेही उघड केले. त्यांच्या माहितीनुसार सुरुवातीला 11 पाणबुडी मोटारी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देऊन न्यायालयीन कोठडी मिळवून आणखी तपास केला असता, आणखी 18 पाणबुडी मोटारी हस्तगत करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण 1 चोरीची मोटारसायकल आणि 29 पाणबुडी मोटारी आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत.








