जळगावच्या राजकारणात खळबळ ; आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

ऑक्टोबर 15, 2025 10:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडीला वेग आला असून याच दरम्यान पक्षांतराचे वारेही जोरदार वाहू लागले आहे. मित्र पक्ष असलेल्या भाजपला शिंदें गटाने जळगाव जिल्ह्यात जोरचा झटका दिला आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

eknath shinde cm

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संतोष बांगर, आमदार अमोल पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, माजी आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थित होते.

माजी आमदार चौधरी यांच्याबरोबर ठाकरे गटाचे अमळनेरमधील माजी शहर प्रमुख प्रवीण पाठक, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन, माजी सभापती श्रीराम चौधरी, माजी सभापती देविदास महाजन, माजी नगरसेवक पंकज चौधरी, गुलाब पाटील, महेश जाधव, किरण बागुल, बाळासाहेब संघनाशिव, साखरलाल महाजन आणि इतर असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची ताकद वाढली आहे.

माजी आमदार चौधरी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१४ मध्ये पहिल्यांदा अमळनेरमधून अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर चौधरी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देखील दिली. परंतु, राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल पाटील यांनी त्यांचा त्यावेळी पराभव केला होता. २०२४ च्या निवडणुकीत अमळनेरची जागा अजित पवार गटाला सुटल्याने माजी आमदार चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली. परंतु, या वेळी त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now