जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । मुक्ताईनगर शहरापासून जवळ असलेल्या पुर्णाड फाटा नजीक लाखो रुपयाचा अवैध गुटखा जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पुर्णाड फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयास्पद दिसणाऱ्या एका आयशर ट्रक(एमएच ४० सीडी ९३५८) ला पोलिसांनी थांबवून त्याची तपासणी केली. ट्रकची तपासणी केली असता, त्यात गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला. हा मुद्देमाल लाखोंच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी या ट्रकमधील चालकाकडे गुटखा वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. त्यामुळे, पोलिसांनी तात्काळ चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच, अवैध गुटख्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक दोन्हीही जप्त करून मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले आहे.
मात्र, या मोठ्या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, या गुटख्याचा साठा कोठून आला आणि कुठे घेऊन जात होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पुढील तपासात गुटखा तस्करीच्या या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.












