जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील १९ किलोमीटर लांबीच्या पाळधी–तरसोद बायपास रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात अधिकृत उद्घाटन होऊन, वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान या बायपासच्या माध्यमातून पाळधी–तरसोद दरम्यानची वाहतूक शहराबाहेर वळवता येणार असून त्यामुळे शहरातील महामार्गावरील वाहतुकीची वर्दळ घटणार आहे.तसेच प्रदूषणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे

खरंतर २०१७ मध्ये जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या पाळधी ते तरसोद फाट्यापर्यतच्या १९ किमी बायपासच्या कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला काही काम झाल्यानंतर मक्तेदार बदलण्यात आला, त्यानंतर २०१९ ला पुन्हा या कामाला सुरुवात झाली. मात्र, पुन्हा कोरोनामुळे या कामावर परिणाम झाला, अखेर ८ वर्षानंतर बायपासचे काम पूर्ण झाले आहे.

पाळधी–तरसोद बायपासलगतच्या सर्व ६ उड्डाणपुलांसह अनेक ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले आहेत. महावितरणला मीटरसाठीची सर्व रक्कम वर्ग करून दिली आहे. मात्र, अद्यापही कनेक्शन नसल्याने, पथदिवे सुरू करण्यात आलेले नाहीत. यासाठी महावितरणकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान पाळधी–तरसोद बायपास आता पूर्ण झाला असून मात्र या बायपासवरून अधिकृतपणे वाहतूक कधी सुरू होणार याची प्रतीक्षा जळगावकरांना आहे. यातच १५ ऑगस्ट रोजी बायपासचे उदघाटन होण्याची शक्यता असून पावसाने उसंत दिली तर किरकोळ कामे देखील पूर्ण होतील, अशी माहिती प्रकल्प संचालक गौतम दत्ता यांनी दिली.
कसा झाला आहे बायपास…
- पाळधी बायपास ते तरसोद फाट्यापर्यंत एकूण १९ किमीचा बायपास आहे.
- बायपासलगत एकूण ६ उड्डाणपूल आहेत. त्यात गिरणा नदीवर ३०० मीटरचा पुलाचा समावेश आहे.
- कानळदा, ममुराबाद व आसोदा या तीन रस्त्यांलगत अंडरपास येणार आहेत. या ठिकाणी समांतर रस्ते देखील तयार करण्यात आले आहेत.
- – सुरत रेल्वेलाईन व भादली जवळ दोन उड्डाणपूल आहेत.
- पाळधीकडून येणाऱ्या वाहनधारकांना यावल व चोपड्याकडे देखील जाणे सोईस्कर राहणार आहे.












