जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहरातील बस स्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अनेकांची लूटमार झाल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे . अशातच जळगाव रेल्वे स्थानकावर गोवा एक्स्प्रेसमध्ये चढताना एका नर्सची हँडबॅग चोरट्यांनी लांबवली. त्यात २ लाख ४१ हजारांचे दागिने होते. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून भुसावळच्या दोघांना सराफ बाजारात ताब्यात घेतले.

२ ऑगस्टला नांदगाव (जि. नाशिक) येथील नर्स असलेल्या ज्योती प्रकाश भोसले (वय ३९) ह्या जळगाव ते मनमाड प्रवासासाठी निघाला. जळगाव स्थानकावर गोवा एक्स्प्रेसमध्ये (क्र. १२७८०) बसताना त्यांच्याकडे तीन बॅग व एक हँडबॅग होती. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची हँडबॅग लांबवली. काही अंतर पुढे गेल्यावर भोसले यांना हँडबॅग चोरीची जाणीव झाली. पण आई आजारी असल्याने त्या तत्काळ तक्रार नोंदवू शकल्या नाही.

त्यांनी ५ ऑगस्टला भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल केला. यानंतर ६ ऑगस्टला आरपीएफ पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास सुरू केला. त्यात आदित्य ध्यानेश्वर कुमावत (वय १८, रा. भुसावळ) व अस्लम हाफिज शाह (वय १९, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) या दोघांना अटक केली.
असा होता मुद्देमाल
तपास पथकाने चोरट्यांकडून हँडबॅगमधील २४ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (१ लाख ३० हजार), ८ ग्रॅम सोन्याची साखळी (६२ हजार), ३ ग्रॅम सोन्याची नथ (२२ हजार), ३.४० ग्रॅमचे सोन्याचे झुबे (२५ हजार) असा मुद्देमाल जप्त केला. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जीआरपी निरीक्षक सुधीर धायरकर, जळगाव आरपीएफ निरीक्षक अमीत यादव यांनी ही कारवाई केली.









