जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२५ । मागच्या काही वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून त्या कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे.

‘दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर-जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यात या निवडणूका दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापरली जाणार नाही, निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.1 जुलै 2025 नुसार मतदार यादी आहे, त्या परवानगीनुसार मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. आता प्रारूप प्रभाग रचनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
कालच सुप्रीम कोर्टानं नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावत नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आता आगामी निवडणूका नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह होणार आहे.












