जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहे. यातच शहरातील रायसोनी नगरात अंडरपँट (अर्धनग्न) गँगने मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरफोडी करणारी टोळी चित्रित झाली असून एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ७०० ग्रॅम चांदीच्या पादुका, गणपतीची दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. त्यामुळे रक्कम किती होती, हे नेमके समजू शकलेले नाही. तसेच काशी विश्वेश्वर मंदिरातील लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरी झाली. विश्वेश्वर मंदिराची दानपेटी चार महिन्यांपासून उघडलेली नव्हती. त्यातून ८ हजारांची रोकड चोरीला गेली असल्याचा अंदाज आहे.

बंद घराचे तीन दरवाजे तोडून शिरले चोर
दरम्यान, गजानन मंदिर व काशी विश्वेश्वर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या रो-हाऊसमध्ये केतन चौधरी हे शेतकरी राहतात. ते वडिलांना उपचारासाठी मुंबई येथे घेऊन गेल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी या घराचे गेट, लोखंडी सेफ्टी डोअर आणि लाकडी दरवाजासाठी लावलेले तिन्ही कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून दोन ते तीन हजारांची रोकड लंपास केली.
चोर-चोर ओरडताच पसार
गजानन महाराज मंदिरासमोर राहणारे चौधरी हे ठाणे येथे नोकरीला असून, त्यांना तेथे जायचे असल्याने ते झोपेतून लवकर उठले होते. त्यावेळी त्यांना मंदिराजवळ चारजण दिसले असता ते ‘चोर-चोर’ असे ओरडताच चोरटे तेथून पसार झाले.
सीसीटीव्हीत चड्डी गँग कैद
दरम्यान चोरीच्या या घटना परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. तोंडाला मास्क, रुमाल लावून केवळ चड्डीवर असलेले चारजण रस्त्याने येताना दिसत आहे. एका घराकडे पाहत जात ते मंदिरांमध्ये प्रवेश करून चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मंदिरातून निघताना एकाने चप्पल हातात घेतलेली आहे, तर एकाने कमरेला बांधलेली दिसत आहे. मध्यरात्री २.३१ वाजेदरम्यानचे फुटेज कैद झाले आहेत. शस्त्रधारी चोरट्यांच्या संचाराने रायसोनी नगरवासीय धास्तावले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.









