जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसात जळगाव शहरात छुप्प्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध कुंटखान्यावर पोलिसांनी छापा टाकल्याच्या घटना समोर आलीय. ज्यात बांगलादेश महिलांसह तरुणी आढळून आल्या. दरम्यान अशातच नोकरीचे अमिष दाखवून बांगला देशातून कोलकाता, मुंबईमार्गे नाशिकमध्ये आलेल्या बांगलादेशी तरुणीने आपल्या परिचिताला मोबाइलवरुन लाइव्ह लोकेशन पाठवल्याने सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने तिची सुटका होऊ शकल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मुलीला डांबून ठेवणाऱ्या पुजा जाधव हीला कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बांगलादेशी तरुणीची आशादीप शासकीय वसतीगृहात रवानगी केली.

पुणे येथील पुणे फ्रीडम् फ्री या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुणे येथून जळगावात येऊन पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन बांगलादेशी मुलीला डांबून ठेऊन तिला देहविक्री व्यवसायात लोटण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती दिल्यावरून प्रोफेसर कॉलनीतील गेल्या गुरुवारी एका घराची झडती घेऊन तिची सुटका केली. या प्रकरणी मुलीला डांबून ठेवणाऱ्या पूजा आत्माराम जाधव या महिलेवर पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पूजा जाधव हिला कोर्टात हजर केले असता कोर्टाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.

नोकरीचे अमिष देऊन बांगलादेशी २५ वर्षीय तरुणीला काहींनी बांगलादेशातून कोलकाता येथे आणले. तेथून त्या तरुणीला मुंबई येथे ८ ते १० दिवस कोंडून ठेवले. त्यानंतर तिला नाशिकला पाठवले. या ठिकाणाहून तरुणीने तिचे लोकेशन पाठवले. तिच्या कुटुंबियांनी हा प्रकार एका सामाजिक संस्थेला सांगितला. या संस्थेने तरुणीचा शोध घेतला असता ती नाशिकहून जळगावला गेल्याचे कळले. त्यानंतर संस्थेने जळगाव पोलिस अधीक्षकांचे कार्यालय गाठून मुलीला डांबून ठेवलेले लोकेशन दाखवले. त्यानंतर जिल्हापेठ व एलसीबीने तिची सुटका केली.
पुजावर यापूर्वी पीटाचे २ गुन्हे
बांगलादेशी तरुणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पूजा जाधव या महिलेवर यापूर्वीही खंडेरावनगर व जिल्हापेठ हद्दीत देहविक्रीला भाग पाडल्याचे २ गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी दिली.









