जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जळगावसह राज्यात महिलासंह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नसून अशातच जळगावच्या पारोळा तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर एका मुलाने अत्याचार केला असून, या अत्याचारातून ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार समोर येताच तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी सोनू नावाच्या मुलावर पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पारोळा तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी आपल्या पालकांसोबत राहते. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत, पीडित मुलगी पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना, तिची पारोळा बसस्थानकावर सोनू नावाच्या एका मुलासोबत ओळख झाली. या ओळखीचा फायदा न घेत त्याने पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार फेब्रुवारी २०२५ मध्ये – घडला होता. त्यानंतर, काही दिवसांनी पुन्हा त्या नराधमाने मुलीला दुसऱ्या एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

पीडितेच्या आईने दिली फिर्याद
गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या गंभीर घटनेने हादरलेल्या पीडित मुलीच्या आईने तात्काळ पारोळा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, सोनू (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










