जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२५ । २००६ च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या सर्व १२ आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यापैकी ५ जणांना आधीच शिक्षा सुनावण्यात आली होती, तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयानेही आरोपींना निर्दोष घोषित केले आणि त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले.

या सर्वांना दोषी ठरवण्यासाठी कोणतेही पुरावे आढळले नाहीत. “सरकारी पक्षाला खटला सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयश आले”, असे निरीक्षण न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने नोंदवले. न्यायालयाला जवळपास सर्वच सरकारी वकिलांचे म्हणणे विश्वासार्ह वाटले नाही, असेही मत न्यायालयाने नोंदवले.

बचाव पक्षाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, महाराष्ट्र ATS ने आरोपींकडून जबरदस्तीने आणि छळ करून जबाब मिळवले. तसेच, आरोपींना १८ वर्षे कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांचे आयुष्याचे महत्त्वाचे वर्षे नाहक गेल्याचा दावा केला गेला.
२०९ जणांचा मृत्यू, ७०० जखमी
११ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये सात ठिकाणी स्फोट झाले. हे स्फोट माटुंगा, खार, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली, मीरा रोड आणि भाईंदर येथे संध्याकाळी 6:24 ते 6:35 दरम्यान झाले. या हल्ल्यात 209 जणांचा मृत्यू झाला, तर 700 हून अधिक जण जखमी झाले. रिमोट कंट्रोलद्वारे प्रेशर कुकरमध्ये ठेवलेल्या स्फोटकांचा वापर झाला होता. या प्रकरणात 11 आरोपींना शिक्षा झाली होती, परंतु 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली, कारण अभियोजन पक्षाला पुरावे सिद्ध करण्यात अपयश आले.












