जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२५ । काही वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना खासगी मोबाइलद्वारे मनमानी पद्धतीने ई-चलान पाठवले जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना, एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांना यापुढे खासगी मोबाइलवर वाहतूक नियम मोडणाऱ्याचे फोटो काढून ई-चलानद्वारे दंडाची कारवाई करता येणार नाही. असे केल्यास त्याच वाहतूक पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होईल, असे नवे निर्देश राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी काढले आहेत.

राज्याच्या परिवहन विभागाच्या मंत्र्यांनी २ जुलै रोजी घेतलेल्या बैठकीत वाहतूक संघटनांनी वाहतूक पोलिस हे खासगी मोबाइलवर एकाच वेळी अनेक वाहनांचे फोटो काढून ते सोयीनुसार ई-चलान प्रणालीत अपलोड करून चुकीचे चलान देत असल्याची बाब बैठकीत मांडली. त्यावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी नवे निर्देश ३ जुलै रोजी दिले आहेत.

त्यात अनेक पोलिस अधिकारी, अंमलदार खासगी मोबाइलमध्ये फोटो काढून रिअल टाइम (वास्तविक वेळ) सोडून सोयीनुसार चुकीच्या पद्धतीने चलान जनरेट करतात. अशाप्रकारे ई-चलान बनवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले आहेत.












