जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. तर काही जिल्ह्यांत अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नसल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय असणार असून याबाबत हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. हवामान विभागाने आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील अनेक भागांत शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भात आज काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली तर विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे.
जळगावात पाऊस लांबला
दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रात अचानक बदल व वाऱ्यांच्या दिशेतील तात्पुरत्या अडथळ्यामुळे जळगावात जोरदार पावसाला विलंब होत आहे. जुलैचे पहिले चार दिवस उलटूनही पाऊस नाही. गुरुवारी दिवसभरात शहरात सरी कोसळल्या मात्र मुसळधार पाऊस झाला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.












