Jalgaon : हतनूर धरणाचा विसर्ग घटला, गिरणेच्या जलसाठ्यात वाढ, वाघूर धरणातही मुबलक पाणीसाठा..

जुलै 2, 2025 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२५ । काही दिवसापूर्वी विदर्भात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु आता पाण्याची आवक कमी होताच हतनूरचे उघडलेले १० दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले आहेत. दोनच दरवाजे सध्या ०.५ मीटरने उघडे असून, त्याद्वारे २०४८ क्यूसेकने पाणी नदीत सोडण्यात आले.

hatnur dam jpg webp

जून महिना संपून जुलै महिना उजाडला. तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप पावसाची दमदार सुरूवात झालेली नाही. त्यामुळे सातपुडा पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्या वगळता इतर सर्व नद्या अजूनही खळाळलेल्या नाहीत. असे असताना, विदर्भ तसेच हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होऊन पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने तापी नदीवरील हतनूर धरणाची पाणी पातळी वाढली.

या धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा ४६ पैकी १२ दरवाजे उघडले होते. मात्र आता आवक कमी होताच उघडलेले बहुतांश दरवाजे आता बंद करण्यात आले असून, दोनच दरवाजे ०.५ मीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, हतनूरचे उघडलेले १० दरवाजे बंद करण्यात आल्यानंतर तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमधील पाण्याची आवकही आता प्रभावित झाली आहे. या बॅरेजचा फक्त एक दरवाजा ०.५० मीटरने उघडा ठेवण्यात आला आहे, ज्या माध्यमातून तापी नदीत १६९३ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

हतनूर सध्या २८.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या स्थितीत ६४.९६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे जळगावकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. तसेच अर्ध्या जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा नदीवरील धरणाचा उपयुक्त पाणीसाठा २ जुलैअखेर ३५. ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. या दिवसावर गेल्या वर्षी जेमतेम १२ टक्के पाणीसाठा गिरणा धरणात होता. त्या तुलनेत यंदा तब्बल २३ टक्के अधिकचा उपयुक्त पाणीसाठा गिरणा धरणामध्ये निर्माण झाल्याने जिल्ह्यास बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now