जळगाव लाईव्ह न्यूज : गेल्या काही महिन्यांपासून भाजपात सुरु असलेली जोरदार इनकमिंग व आयात उमेदवारांना दिली जाणारी संधी, यावरून राज्यभरात भाजपात अंतर्गत धुसफूस सुरु आहे. त्यातच आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधील शिवसेनेचे वादग्रस्त उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध होता. पण या विरोधाला न जुमानता हा प्रवेश झाला. या ‘आयात पॅटर्न’ चा जळगावमधील भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी मोठा धसका घेतला आहे. कारण जळगावमध्येही भाजपात प्रवेश करण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. परंतु यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींमधील अस्वस्थता वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. आधीच विरोधक वॉशिंग मशिन म्हणून भाजपाला हिणवत असतांना आता तर भाजपाच अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. याला जळगाव देखील अपवाद नाही. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयात उमेदवारांच्या चर्चेमुळे पक्षनिष्ठ फक्त सतरंज्या उचलण्यासाठीच असतात का? अशी चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. जे नेते पदासाठी इकडून तिकडे सोईस्कर राजकीय उड्या मारतात, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवावा, असा सुरु आतापासूनच उमटू लागला आहे. पक्षाने अन्य पक्षातून आयात केलेल्यांना उमेदवारी न देता तसेच पक्षाला धोका देवून फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांऐवजी पक्षातीलच एकनिष्ठांना संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दोन वर्षांपासून जळगाव शहर महापालिकेवर प्रशासकराज
सुमारे सहा लाखांवर लोकसंख्येच्या जळगाव महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सप्टेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आली. २०१८ मध्ये भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकत महापालिकेवर झेंडा फडकवला. मात्र त्यानंतर तोडफोडीचे राजकारण होवून शिवसेनेने महापालिका भाजपाकडून हिसकावून घेतली. नंतरच्या काळात शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तासंघर्ष सुरूच राहिला. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदा होणाऱ्या महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षीय समीकरणे बदलू शकतात.
ठाकरे गटापुढे अडचणी
जळगाव महापालिकेत २०१८ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. प्रत्यक्षात भाजपने सर्वाधिक जागा पटकावत वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, शिवसेनेने नंतरच्या काळात काही नगरसेवक फोडून महापालिकेची सत्ता ताब्यात घेत भाजपला मोठा धक्का दिला होता. आता शिवसेनेतच दोन गट पडले आहेत. त्यामुळे महापालिकेची सत्ता ताब्यात घेणे ठाकरे गटासाठी पूर्वी इतके इतके सोपे यावेळी निश्चितच असणार नाही. याची जाणीव ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनाही असल्याने अनेकांचा ओढा भाजपाकडे वाढला आहे.
नवीन वर्षामध्येच निवडणुका
नगरविकास विभागाने यापूर्वी ११ जून ते ४ सप्टेंबरपर्यंत चालणारा प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम आता ११ जून ते ६ ऑक्टोबर असा लांबला आहे. अंतिम प्रभागरचना झाल्यानंतर मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम तसेच अंतिम प्रसिद्धीसाठी जवळपास दीड महिना लागणार असल्यामुळे निवडणुका नवीन वर्षामध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.











