जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । बसमधून महिलेचे ९ तोळे सोने लांबवणाऱ्या चोरट्या महिलांना अमळनेर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या महिला राज्यभरातील विविध जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशमध्ये चोरी करण्यात पटाईत असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८) या ६ रोजी धरणगावहुन जळगाव ते दोंडाईचा या बसमध्ये प्रवास करीत होत्या. तेव्हा पर्समधून त्यांचे ९ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. यानंतर घटना परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी पथकाला पैलाड नाक्यावर तपासाठी पाठवले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन संशयित महिला एका बस मध्ये बसून परत जाताना दिसल्या. पोलिसांनी या महिलांचा तपास केला असता या महिला कुसुंबा जळगाव येथे विमानतळाच्या बाजूला बस्तान मांडून असल्याची माहिती मिळाली. मात्र तेथे पोहोचेपर्यंत संशयित महिला पसार झाल्या. पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेतला असता त्या अकोला येथे असल्याची माहिती मिळाली.
अकोला येथूनही या महिला पसार झाल्या होत्या. त्या महिला परतवाडा येथे गेल्याची माहिती मिळाली. परतवाडा येथे एका रिक्षात निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत होते. पोलिस त्यांच्या मागावरच होते. तेथून त्या क्रूड जि. अमरावती याठिकाणी पोहोचल्याची माहिती प्राप्त झाली. तब्बल ३५० सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले होते. वरुड येथे त्यांना शोधण्यासाठी पोलिस भटकत होते. अखेर वरूड येथे या महिलांना पोलिसांनी शिताफिने पकडले. याचोर दोन महिलांसोबत त्यांच्या टोळीतील आणखी दोन महिला संशयित म्हणून आढळून आल्या आहे.
गंगा चैना हातगळे (वय ४०) आणि गंगा सुभाष नाडे (वय ४५, दोन्ही रा. नेताजी नगर, यवतमाळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दोन्ही महिला संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ४ तोळे वजनाच्या ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या २ बांगड्या आणि ५ तोळे वजनाची ४ लाख २० हजार रुपयांची सोन्याची मंगलपोत असा ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.