डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘आरोग्यसेवेत लिंग समानता: अंतर भरून काढणे’ या महत्त्वपूर्ण विषयावर वैद्यकीय शिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध मान्यवर तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले विचार मांडले. वैद्यकीय क्षेत्रात लिंग समानतेच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आणि त्यावरील उपाय शोधण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.
या कार्यशाळेचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडीसीन विभागाच्या प्रमुख डॉ. योगीता बावस्कर- हिवरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजनाने करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीएम कार्डीओलॉजीस्ट वैभव पाटील, डीन डॉ. प्रशांत सोळंके, एमडी मेडीसीन तज्ञ डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. सी.डी. सारंग, होमीओपॅथी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी.बी. पाटील, डीन डॉ. आर.के. मिश्रा, डॉ. देवेंद्र चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत महिला व पुरुषांना आरोग्यसेवेतील समान संधी, स्त्रिया व पुरुषांच्या आरोग्यविषयक गरजा, त्यामधील तफावत आणि वैद्यकीय क्षेत्रातील लिंगभेद या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एन. एस. आर्विकर यांनी ‘महिला सक्षमीकरण: कायदेशीर आणि इतर पैलू’ यावर विचार मांडले. त्यानंतर डॉ. योगिता बावस्कर यांनी ‘जीवनशैली औषध म्हणून’ यावर सखोल मार्गदर्शन केले. तर स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर, डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. सी.डी. सारंग यांनीही विविध विषयांवर सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कार्यशाळा
या कार्यशाळेला वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थी, निवासी डॉक्टर आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिंग समानतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा अधिक परिणामकारक कशी बनवता येईल, याविषयी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांना प्रश्न विचारून सखोल चर्चा केली. कार्यशाळेच्या शेवटी आरोग्यसेवेतील लिंग समानतेच्या उद्दिष्टांसाठी आरोग्य सेवांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, ग्रामीण भागातील स्त्रियांपर्यंत आधुनिक वैद्यकीय सुविधा पोहोचवणे आणि आरोग्यसेवेतील लिंगभावी तफावत दूर करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे ठरवण्यात आले.