जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । जळगाव महापालिकेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची आठवण करून दिली. महिलांच्या सुरक्षेवर बोलताना, महिलांनी आपल्या पर्समध्ये लाली पावडर न ठेवता मिरचीची पूड व चाकू ठेवायला हवा असे आवाहन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं, असं त्यांनी सांगितले.

आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता महिलांनी वाघीण झालं पाहिजे. आजची नारी अबला न राहता ती सबला झाली पाहीजे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेलं वाक्य त्यांना आठवलं. ते म्हणाले, महिलांनी पर्समध्ये लाली पावडर न ठेवता चाकू व मिरची ठेवायला हवे असे जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले तेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, आज खरोखर वेळ तशी आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. महिलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांनी आत्महत्या न करता त्यावर उपाय शोधावा टोकाची भूमिका घेऊ नये असेही पाटील म्हणाले.
आज मॉलची संस्कृती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महिला बचत गटांसाठी महानगरपालिकेने मॉलची व्यवस्था करावी तसेच महानगरपालिकेचे जे गाळे निर्माण करण्यात येतील त्यातील पाच टक्के गाळे बचत गटांना देण्यात याव्यात अशा सूचना पाटील यांनी केल्या. यावेळी कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, आयुक्त एकनाथ ढेरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आम्हाला निवडून देण्यामध्ये सर्वात मोठा हात या बहिणींचा आहे. त्यामुळे मामा व भाऊ म्हणून आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही शंभर टक्के पार पाडू असे आश्वासन त्यांनी दिले.