जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२५ । गेल्या महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे अजित पवार(Ajit Pawar) गटाचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यावेळी मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्रीपद देण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने बहुमत मिळविले असून अनिल पाटील पुन्हा अमळनेरमधून (Amalner) निवडणूक जिंकले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, याच अनिल पाटलांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात डावलण्यात आलं. त्यामुळे अनिल पाटील व त्यांचे समर्थक नाराज होते. मात्र, अनिल पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी उशीरा का होईना अजित पवार गटाने प्रयत्न केला असून त्यांना पक्षात मोठी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkre) यांनी त्यांची प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदावर नियुक्ती केली असून, त्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
सध्या, जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या ११ आमदारांपैकी एकमेव अमळनेरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. अनिल पाटील यांचा मतदारसंघात चांगला दबदबा आहे, त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. परंतु फडणवीस सरकारच्या प्रत्यक्षात, मंत्रिमंडळ विस्तारावेळी अनिल पाटील यांना बाजूला ठेवण्यात आले. पाटील यांच्याऐवजी भाजपचे संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली. मंत्रीपद नाही किमान एखादे महामंडळ तरी मिळेल, या आशेवर असलेल्या पाटील यांना त्यासाठीही विचारले गेले नाही. त्यामुळे पूर्वीसारखा मान सन्मान राहिलेला नसताना वाय प्लस दर्जाची सुरक्षा काय कामाची, असा विचार करून अनिल पाटील यांनी ती काढून घेण्याचे पत्र पोलीस अधीक्षकांना देत आपल्या नाराजीचे जाहीर प्रकटीकरण केले होते.
त्यामुळे अनिल पाटील यांना फार काळ नाराज ठेवून चालणार नाही, हे लक्षात घेता त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून अखेर झाला आहे. त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अमळनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष देखील केला.