जळगाव लाईव्ह न्यूज। १२ फेब्रुवारी २०२५ । जळगावसह राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून आधी सकाळी व संध्याकाळी गारठा जाणवत होता. मात्र तो देखील जाणवत नाहीय. दिवसाचा उन्हाचा चटका वाढल्याने जळगावकर हैराण झाला असून यातच हवामान खात्याने तापमान वाढीचा अंदाज वर्तविला आहे.

मंगळवारी जळगावात कमाल तापमान ३३.९ अंशांवर पोहोचले होते. तर दुसरीकडे किमान तापमानाचा पारा घसरला. सोमवारी १६ अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा मंगळवारी १३ अंशावर घसरला होता. मात्र थंडी जाणवली नाही.
यातच आता उद्यापासून कमाल तापमानात आणखी एक ते दोन डिग्रीने वाढ होणार आहे. त्यामुळे १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान तापमान ३४ ते ३५ अंशांवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना अतिशय उष्ण राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या जळगावात दिवसा हिवाळा तर दुपारी उन्हाळा असे बदल होत आहेत. उद्या १३ तारखेपासून कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांच्या आसपास राहील. त्यानंतर पुन्हा तापमानात चढ-उतार बघायला मिळणार आहे.
सध्याचा वाऱ्यांच्या वहनाचा पॅटर्न बदलत नाही, तोपर्यंत थंडीची शक्यता कमी आहे. जोपर्यंत उत्तरेकडून थंडीला पोषक वारे वाहत नाहीत, तोपर्यंत थंडी वाढणार नाही, असा अंदाज असा अंदाज निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मात्र १७ व १८ फेब्रुवारी या काळात थंडीची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.