जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. यातच जबरी चोरीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. अशातच बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दुचाकीस्वार दोघांनी दांपत्याकडून ९ लाख रूपये असलेली पिशवी हिसकावून घेत पळ काढला. ही घटना अमळनेरातील भोईवाडा भागात घडली.

उसने पैसे परत करण्यासाठी व काही पैसे जवळ असावे म्हणून ही रक्कम दांपत्याने बँकेतून काढली होती. बँकेपासून घरापर्यंत १५ मिनिटांत पोहचल्यांनतर चोरट्यांनी रक्कम लंपास केली. दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याचा शोध सुरु आहे.
पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी बापू शिंगाणे हे त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासह आयडीबीआय बँकेत सोमवारी दुचाकीने गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत ठेवले. पिशवी जवळ ठेवून ते घराकडे आले. घराजवळ दुचाकी थांबवली असता अचानक काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेत कसाली डीपी भागाकडे पळ काढला. काहींनी या चोरट्यांचा पाठलागही केला. मात्र ते पसार झाले.