जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे कापसाला भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्यातच गेल्या दहा दिवसापासून शासनाकडून सुरू असलेली सीसीआयची खरेदी बंद पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सीसीआयची खरेदी थांबल्यानंतर खासगी बाजारातील कापसाचे दर कमी होत असून सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

खासगी बाजारात कापसाला जेमतेम भाव मिळत आहे. खासगी बाजारात कापसाला केवळ ६२०० ते ६५०० रुपयांचे दर मिळत आहेत. काही ठिकाणी तर हे भाव ६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत. अशा परिस्थितीत सीसीआयच्या केंद्रावर बऱ्यापैकी भाव शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र, सीसीआयची केंद्र देखील बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
सीसीआयकडून मालाला गुणवत्तेचा निकष लावला जात असताना, जिल्ह्यात मात्र सरसकटपणे शेतकऱ्यांचा माल सीसीआयच्च्या केंद्रावर नाकारला जात आहे. त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुढे करून, सीसीआयने एकप्रकारे खरेदीच बंद केल्याचे चित्र आहे. सीसीआयच्या केंद्रावर ८ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असलेल्या मालालाच हमीभाव एवढा दर दिला जात आहे. तर १३ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असलेला माल सरसकट नाकारला जात आहे. मात्र, हे निकष सीसीआय आपल्या मनाप्रमाणे लावत असल्याचा आरोप कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. सीसीआयच्या केंद्रावर देखील शेतकऱ्यांना पूर्ण हमीभावाचा दर यंदा मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान ‘सीसीआय’ला ज्या गुणवत्तेचा माल हवय त्या गुणवत्तेचा माल उपलब्ध होत नसून जर चांगला माल असेल व सीसीआयच्या निकषात बसेल असेल तर तो माल सीसीआयकडून खरेदी केला जात असल्याचे सीसीआयचे प्रादेशिक प्रमुख स्वप्नील धडमल यांनी सांगितले.
खासगी बाजारात कापसाची आवकच नाही…
एकीकडे सीसीआयचे केंद्र बंद असताना, खासगी बाजारात शेतकरी आपला माल आणतील अशी स्थिती होती. मात्र, खासगी बाजारात आधीच भाव कमी असल्याने खासगी बाजारात कापसाची आवकच बंद आहे.