जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाजवळील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनला अचानक आग लागली. ही घटना आज ६ फेब्रुवारीला दुपारी घडली असून आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र या आगीमुळे हॉटेल मुरली मनोहर आणि जवळील वेलनेस मेडिकल दुकानाचेही नुकसान झाले आहे.

घटना घडल्यावर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांची मदत मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत आग विझवण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर नागरिकांनी परिसरातील दुचाकी आणि इतर वाहने सुरक्षित ठिकाणी हलवली, ज्यामुळे आणखी कोणतेही नुकसान होण्यापासून टळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस विभाग आणि अग्निशमन दल तात्काळ कारवाईसाठी दाखल झाले. मात्र, पोलीस ठाण्यात अद्याप या प्रकरणी कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही, तसेच आगीचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.