संतापजनक! पाचोरा रेल्वे दुर्घटनेत सासू गेली, मृतदेहाजवळ शोक करणाऱ्या सुनेला चोरट्यांनी लुटले
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । पाचोरा जवळील परधाडे रेल्वे दुर्घटनेने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत कर्नाटक एक्स्प्रेसखाली चिरडले गेल्यानं 13 जणांचे बळी गेले. रेल्वे रुळावर पडलेल्या छिन्नविछिन्न मृतदेह पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. अनेकांनी आपल्या प्रियजनांचा मृत्यू डोळ्यापुढे पाहिला, पण त्या स्थितीतही चोरट्यांनी शोकाकूल व्यक्तींच्या सामनावर डल्ला मारल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसने कमला भंडारी या आपल्या सुनेसह मुंबईच्या दिशेने येत होत्या. त्या मूळच्या नेपाळच्या होत्या. आपला मुलगा व सुनेसोबत त्या मुंबईत राहत होत्या. रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरताच कमला भंडारी यांनी त्याची माहिती आपल्या सुनेला दिली. त्यानंतर इतर प्रवाशांसोबत त्या दोघीही गर्दीतून कशाबशा खाली उतरल्या. पण त्यांची ताटातूटी झाली. सासू कमला रुळाच्या दिशेने उतरल्या आणि त्यांची सून राधा भंडारी या दुसऱ्या बाजूने उतरल्या.
सासूच्या बॉडीजवळ रडताना पर्स लंपास
त्यानंतर राधा यांनी आपल्या सासूची शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना त्यांचा मृतदेह रुळावर पडल्याचे दिसले. क्षणभरापूर्वी सोबत असणाऱ्या सासूचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याचे पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्या आपल्या सासूला सावरत असताना दगडाचे काळीज असणाऱ्या काही चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील मोबाईल व पैसे लंपास केले. यामुळे दुःखाच्या स्थितीत त्यांना एक वेगळाच धक्का बसला.