जळगावात चाललंय काय? तरुणाच्या हत्येनंतर आरोपींची घरे जाण्याचा प्रयत्न
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२५ । जळगाव शहरात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेम विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला होता.या हल्ल्यात मुकेश शिरसाठ या तरुणाचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आज तरुणाच्या कुटुबीयांनी संशयीत आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीला सोमवारी २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उघडलेला आहे. पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केली.
काय आहे घटना?
मुकेश शिरसाठने पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता, ज्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना संताप झाला होता. या संतापाचा परिणाम म्हणून, मुलीच्या कुटुंबीयांनी मुकेशसह त्याच्या कुटुंबीयांवर भरदिवसा हल्ला केला. या हल्ल्यात मुकेशचा मृत्यू झाला, तर त्याचे पाच नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
हल्ल्यात सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठ्यांच्या सहाय्याने मुकेश आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. या घटनेनंतर, आज मुकेशच्या कुटुंबीयांनी आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली की याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि तरुण आणि तरुणीच्या घराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.