पालकमंत्र्यांची यादी जाहीर; जळगावच्या पालकमंत्री पदाची माळ पुन्हा गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२५ । राज्यात जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असून महायुतीकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. तर गिरीश महाजन यांची नाशिक जिल्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आलीय
तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रिपद होतं.
विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि यानंतर मंत्रीपदांचा शपथविधी होऊन देखील अद्याप पालकमंत्री पदांची यादी जाहीर झालेली नव्हती. यातच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री पदाची धुरा ही गुलाबराव पाटील यांच्याकडे असली तरी आता भाजपकडून याचा दावा करण्यात आलेला होता. यामुळे पालकमंत्री पद नेमके कोणाला मिळणार याबाबत मोठीच उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कोण कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.