Muktainagar : वडोदाचा ग्रामविकास अधिकारी निलंबित; नेमकं कारण काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी विजय विष्णू सातव यांना निलंबित करण्यात आले आहे. 17 जानेवारी 2025 रोजी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी हा निर्णय घेतला. जुलै 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये वडोदा ग्रामपंचायतीला 15व्या वित्त आयोगाचा निधी मिळाला होता, परंतु या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व अपहार झाल्याचे समोर आले.
वडोदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रंजना कोथळकर व प्रदीप हरिदास कोथळकर यांनी अनेकदा गटविकास अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे या अनियमिततेच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने व चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी विजय सातव यांचे निलंबन केले.
गावामध्ये रस्ता काँक्रिटीकरण, गटार ढापे, एलईडी लाईट, गावतळे खोलीकरण या कामांसाठी निधी वापरला गेला होता, परंतु प्रत्यक्षात ही कामे झालेली नसल्याची तक्रार होती. या प्रकरणातील आर्थिक अनियमिततेमुळे सातव यांचे कडील कार्यभार कुऱ्हा येथील ग्रामविकास अधिकारी शंकर इंगळे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.