Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने-चांदी दरात मोठी वाढ, भाव वाचून फुटेल घाम
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२५ । नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने -चांदी (Gold Silver) दरात वाढ होताना दिसत आहे. मकर संक्रांतीला सुद्धा या दोन्ही धातुचा दरात वाढ दिसून आली. त्यानंतर भाव उतरला. मात्र गुरुवारी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली. यामुळे जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा भाव विनाजीएसटी ८० हजार रुपयाच्या जवळ पोहोचला आहे. Gold Silver Rate Today
जळगाव सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचा दर प्रति तोळ्यामागे नऊशे रुपयांनी तर चांदी प्रति किलोला दोन हजार रुपयांनी वाढला. ही दरवाढ एचएमपीव्ही हा नवीन व्हायरस व डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्यापारी धोरणाचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सोने दर
शनिवारी संपलेल्या गेल्या आठवड्यात दररोज शंभर-दोनशे तर सर्वाधिक चारशे रुपयांनी (दि. १० रोजी) सोन्याच्या दरात वाढ झाली होती. तर गुरुवारी एकाच दिवसात सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली. दोन दिवसात जळगावात सोने दरात ११०० रुपयापर्यंत वाढले. बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ७८८०० रुपये प्रति तोळा होते,ते गुरुवारी वाढून ७९७०० रुपये झाले. तर जीएसटीसह सोन्याचा दर ८२,१०० रुपयावर पोहोचला आहे.
चांदीचा दर
चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात दोन हजारांची वाढ होऊन पुन्हा घसरण झाली होती. बुधवारी ९१ हजार रुपये किलो असलेली चांदी गुरुवारी पुन्हा दोन हजारांनी वाढून ९३ हजारांवर पोहोचली.
दरम्यान आगामी दिवसात सोन्याचा दर ८५ ते ९० हजार रुपयाचा टप्पा गाठू शकतो, तर चांदीचा दर एक लाख १० हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत भाव वाढण्याच्या शक्यतेने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटणार आहे.