जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२५ । जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर अपघाताच्या घटना काही केल्या थांबत नसून अशातच एकही एका अपघाताची घटना समोर आलीय. अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी दुपारी शहरातील पिंप्राळा उड्डाणपुलावर घडली. भारमल पाटील अशी, मयताची ओळख पटली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
या घटनेबाबत असे की, जळगाव शहरातील खोटे नगरकडून वृद्ध हे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बी डब्ल्यू २७३०) ने शहरात येत होते. मात्र याच दरम्यान शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार असलेले वृद्ध हे वाहनाच्या अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेल्याने जागीच ठार झाले. ही घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत झालेल्या वृद्धाची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्याचे काम सुरू होते. या संदर्भात पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.