जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२५ । महाकुंभ (Mahakumbh) हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम तो दर 12 वर्षांनी प्रयागराज (Prayagraj), हरिद्वार (Haridwar), उज्जैन(Ujjain) आणि नाशिक (Nashik) या चार ठिकाणी भरत असतो. यंदा येत्या 13 जानेवारी 2025 पासून युपीमधील प्रयागराज येथे प्रारंभ होत आहे. या कुंभमेळ्यात भारतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक सहभागी होतात. दरम्यान IRCTC ने महाकुंभासाठी 7 राज्यांतून विशेष गाड्या चालवण्याची घोषणाही केली आहे. तुम्हाला महाकुंभला जायचे असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही ट्रेन निवडू शकता.
भारतीय रेल्वे महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर अनेक विशेष गाड्या चालवत आहे. या पार्श्वभूमीवर खास ‘भारत गौरव ट्रेन’ सुरू करण्यात आली आहे. ही विशेष ट्रेन 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ कार्यक्रमाशीही हा उपक्रम जोडला गेला आहे. भारत गौरव ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवासासोबतच जेवण आणि राहण्याची सुविधाही मिळणार आहे. तुम्ही भुसावळमधून तेथे जाऊ शकता.
ही गाडी 15 जानेवारीरोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुण्यातून प्रयागराजसाठी निघणार आहे. याशिवाय प्रयागराजला जाण्यासाठी नांदेड-पटणा-नांदेड, छत्रपती संभाजीनगर-पटणा-छत्रपती संभाजीनगर, काचीगुडा-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद या विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत
तिकीट दर काय असणार?
पुण्याहून प्रयागराजला जाणाऱ्या या भारत गौरव ट्रेनचे इकॉनॉमी क्लास (स्लीपर) तिकीट 22,940 रुपये आहे. तर 3AC तिकीट 32,440 रुपये आहे. तर, कम्फर्ट क्लास 2AC तिकिटाची किंमत 40,130 रुपये आहे. . या ट्रेनमध्ये 14 डबे आहेत, ज्यात 750 प्रवासी बसू शकतात. यामध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, वाराणसी आणि अयोध्या या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.
काय सुविधा मिळणार?
पुणे ते प्रयागराजसाठी भारत गौरव ट्रेनचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना प्रयागराजमध्ये राहण्याची सुविधा मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या टेंट सिटीमध्ये प्रवाशांची सोय केली जाईल. या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात दोन सीसीटीव्ही कॅमेरे, एक सुरक्षा रक्षक आणि एस्कॉर्ट सेवा असेल. तसेच फक्त शाकाहारी जेवण मिळेल.