जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. जळगावमधील कुसुंबा येथील तलाठ्यास तीन हजार रुपयाची लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असताना आता मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे तलाठ्यासह दोन खाजगी पंटरला ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज बुधवार, ८ जानेवारी रोजी सापळा रचून केली असून यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली. प्रशांत प्रल्हाद ढमाळे लाचखोर तलाठ्याचं नाव आहे.
काय होते हे प्रकरण?
तक्रारदार, जळगाव शहरातील रहिवासी असून मुक्ताईनगर तालुक्यातील कोरा गावात त्यांचे मूळ गाव आहे. त्यांचे आजोबा १९७७ मध्ये मयत झाले होते, पण तेव्हापासून त्यांच्या वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे नावे ७/१२ उताऱ्यावर लावलेले नव्हते. गेल्या ७ ते ८ दिवसांपूर्वी तक्रारदाराने कुऱ्हा गावातील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे यांच्याशी भेट घेऊन या संदर्भात माहिती सांगितली.
तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षाचे २२० रुपये प्रमाणे ६ हजार रुपये शासकीय फी भरावी लागेल, जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला ५ हजार रुपये द्यावे लागतील. या मागणीनंतर तक्रारदाराने जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे व त्याचे दोन खाजगी पंटर अरुण शालिग्राम भोलानकार व संतोष प्रकाश उबरकर यांना रंगेहाथ पकडले.
कारवाई व परिणाम
या कारवाईमुळे मुक्ताईनगर तसेच महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचखोरी विरुद्ध कठोर कारवाईच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.