जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे आपण स्वच्छ भुसावळ सुंदर भुसावळ असा नारा देतो मात्र भुसावळ शहरातील श्रीनगर भागात असलेल्या खुल्या भूखंडावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भूखंडावर साधारण बाराशे घरांचे सांडपाणी, कचरा, घाण नाल्यापर्यंत पोहोचण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गटार नसल्याने स्वच्छता होऊ शकत नाही अशी टिपण्णी आरोग्य विभागाने दिली आहे. भूखंड शासकीय असो कि खाजगी, त्यावर नागरिकांचे सार्वजनिक वापराचे सांडपाणी आले आणि साचलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळोवेळी स्वच्छता करण्यात न आल्याने, स्वच्छ परिसर सार्वजनिक सांडपाण्यामुळे अस्वच्छ झाला. त्यामुळे भूखंडांच्या स्वच्छतेची जबाबदारी भुसावळ नपाची होती. न. प. प्रशासनाचे दुर्लक्ष केल्यानेच ही भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिक सांगतात. शहरात स्वच्छता मोहिमेचा गवगवा केला जात असला तरी शहरातीलच अनेक भागांपर्यंत ही मोहीम पोहोचलीच नसल्याने न. प. प्रशासन नियोजनात सपशेल अपयशी झाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
या ठिकाणी झुडपे वाढल्याने डासांची उत्पत्ती वाढली. या डासांमुळे हिवताप, डेंग्यू, फ्लू, चिकनगुनियासारखे विविध संसर्गजन्य आजारांची लागण नागरिकांना झाली, हवेत दुर्गंधी निर्माण झाल्याने श्वसनाचे आजार नागरिकांना झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु लाखो रुपयांचा उपचार नागरिकांना घ्यावा लागला. या झुडपांमध्ये विषारी सरपटणारे प्राणी वावरतात, काही महिन्यांपूर्वी एका महिलेला सर्प दंश झाला, त्यामुळे त्या महिलेने हा परिसरच सोडून दिला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवणे गरजेचे असताना न. पा. प्रशासन जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
घरपट्टीवर बहिष्कार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर देश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गाव व परिसर स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. वेगवेगळ्या मोहिमा राबवून जनजागृती केली जात आहे. मात्र, भुसावळ शहरात नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना नगर परिषदेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांनी घरपट्टी भरणार नसल्याचा निर्धार केला आहे. सांडपाणी व्यवस्था करणे भुसावळ न पा प्रशासनाचे कर्तव्य आहे. दरम्यान, आता न पा प्रशासन किती काळात नैतिकतेने ही समस्या सोडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
प्रजासत्ताक दिनी नागरिकांचे आंदोलन ….
तात्पुरती भेट देऊन अधिकारी फोटो काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवतात. पाच ते सहा वर्षा पासून या परिसरातील नागरिकांनी भुसावळ नगर पालिका प्रशासनाच्या सर्वच विभागांमध्ये अनेक अर्ज केले, निवेदने दिली तसेच वेळोवेळी याबाबतीत माहिती दिली असतानाही या ठिकाणी कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी, दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी, सकाळी ७ वा. भुसावळ नगर पालिका कार्यलयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. मूलभूत सुविधा न मिळणाऱ्या भुसावळ परिसरातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन नागरिकांनी केले आहे.