जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२४ । बारा वर्षांनी उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला. पुणे ते मऊ दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. विशेष या गाडीला जळगाव आणि भुसावळला थांबा असणार आहे.
कुंभमेळ्यासाठी संपूर्ण जगभरातील भाविक प्रयागराज येथे जमा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या माध्यमातून जळगाव भुसावळ मार्गे कुंभमेळ्यासाठी विशेष गाडी चालवली गेली पाहिजे अशी भाविकांची अपेक्षा होती. यातच रेल्वे विभागाने पुणे ते मऊ दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ही अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पुणे ते मऊ विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०१४५५) नवीन वर्षात चालवली जाणार आहे. ही गाडी नवीन वर्षात ८, १६ आणि २४ जानेवारी, ६, ८ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे.
ही गाडी ज्या दिवशी रवाना होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता मऊला पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात मऊ ते पुणे विशेष गाडी (ट्रेन क्रमांक ०१४५६) मऊ रेल्वे स्थानकावरून ९ जानेवारी, १७, २५ जानेवारी, तसेच ७, ९ आणि २२ फेब्रुवारी रोजी धावणार आहे. या दिवशी मऊ रेल्वे स्थानकावरून रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी विशेष रेल्वे पुण्याकडे येणार आहे. ही गाडी मऊ स्थानकावरून रवाना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी पुण्याला पाेहोचणार आहे.
या स्थानकांवर असेल थांबा
दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवडिया, छनेरा , खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा राहणार अशी माहिती समोर आली आहे.