⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात अजय-अतुलचा लाईव्ह कार्यक्रम; कुठे आणि कधी होणार?

जळगाव जिल्ह्यात अजय-अतुलचा लाईव्ह कार्यक्रम; कुठे आणि कधी होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२४ । प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच लार्इव्ह कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे.

रसिक प्रेक्षकांसाठी नववर्षाची एक अनोखी पर्वणी अनुभवण्यास मिळणार आहे. जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरातील जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणाच्या बॅकवॉटर वर असलेल्या बेटावर पर्यटनस्थळाच्या हिरवळीवर या विलोभणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

22 एकर वरील विस्तीर्ण परिसरात हा सोहळा रंगणार आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजेपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून रात्री 8 ते 12 दरम्यान प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम होईल. प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळ गाठण्यासाठी वाघूरच्या पाण्यातून बोटीच्या माध्यमातून जावे लागणार आहे. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत वाघूर धरणाच्या बॅक वॉटर वर असलेल्या सुंदर बेटावर हे पर्यटनस्थळ असून तेथेच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संगीत मैफील अन्‌ पर्यटनही
या ठिकाणी पर्यटकांसाठी बांबू हाऊस उभारण्यात आले असून पर्यटकांसाठी केरळ प्रमाणे तीन व चार बेड असलेली हाऊस बोट सुद्धा येथेच आहे. पर्यटकांना अजय-अतुल यांच्या संगीत मैफीलीसह पर्यटनस्थळाचा आनंद घेता येणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अजय-अतुल या जोडीचा लाईव्ह कार्यक्रम होत असून नववर्षाच्या सुरुवातीला ही एक पर्वणीच उपलब्ध झाली आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची रंगीबेरंगी दिमाखदार विलोभनीय आतिषबाजी देखील होणार आहे.

अजय-अतुल यांची खास मेजवानी
गारखेडा येथील पर्यटनस्थळावर प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल हे खान्देशवासियांना मराठी, हिंदी गाण्यांमधून खास मेजवानी देणार आहेत. झुळझूळ वाहणारे पाणी, गुलाबी थंडी अन्‌ गाण्यांची मैफील असा त्रिवेणी संगम येथे रंगणार आहे. अजय-अतुल ही एक भारतीय संगीतकार जोडी आहे ज्यात अजय अशोक गोगावले आणि अतुल अशोक गोगावले हे भाऊ आहेत. मुख्यत: मराठी आणि हिंदी गाण्यांवर त्यांची पकड आहे. त्यांनी अनेक हिट मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात विश्व विनायक या भक्तिमय अल्बमने केली, ज्यात पारंपरिक गणपती मंत्र आणि सिम्फोनिक संगीताची सांगड होती. नटरंग, सैराट, अग्निपथ, धडक, तुंबड यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटांवर काम केले आहे. मन उधाण वाऱ्याचे, मल्हारवारी, कोंबडी पळाली या त्यांच्या उल्लेखनीय रचना आहेत.

प्रेक्षकांनी लाभ घ्यावा
उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या जळगावच्या लगतच्या भागात पहिल्यांदाच अजय-अतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीचा लाईव्ह कार्यक्रम होत असून ही एक पर्वणीच प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9096961685, 9511770619 किंवा 7559225084 या नंबर्स वर संपर्क साधावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.