Erandol : ट्रॉलीला लावलेला जॅक निसटल्यामुळे ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२४ । एरंडोल तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा एक्सल तुटला असल्याने दुरुस्तीसाठी ट्रॉलीला लावलेला जॅक निसटल्यामुळे ट्रॉलीच्या खाली दाबल्या गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरनार गावात घडली. सोमनाथ गोरख कोळी (वय २०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत असे की, एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील सोमनाथ गोरख कोळी (वय २०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील बोरनार या गावातून जात असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा अचानक एक्सल तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. दरम्यान ट्रॉलीचा एक्सल दुरुस्तीसाठी भातखेडा येथून मॅकेनिक सोमनाथ याला घेऊन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी दुपारी चारच्या सुमारास गावात आला.
ट्रॅक्टरचा तुटलेला एक्सल दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी ट्रॉलीला जॅक लावून कामाला सुरुवात केली. मात्र काम सुरू असताना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक निसटला. यामुळे दुरुस्तीसाठी मदत करणारा सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेननंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मुलाला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.