उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला मोठा धक्का
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असतांना जळगाव शहरात उध्दव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या निवासस्थानी पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला जळगाव ग्रामीणचे उमेदवार तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, भाजपाचे उमेदवार राजूमामा भोळे, जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विष्णू भंगाळे यांच्यासोबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहरात महायुतीला मोठी ताकद मिळाली असल्याचा विश्वास या नेत्यांनी यांनी व्यक्त केला आहे.
माजी महापौर विष्णू भंगाळे हे उबाठा गटाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणून ओळखले जातात. ते उबाठाचे विद्यमान जिल्हाप्रमुख देखील आहेत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या जळगाव दौऱ्यांदरम्यान त्यांच्या सभांच्या नियोजनाची जबाबदारी भंगाळे यांनी मोठ्या कुशलतेने सांभाळली होती. विधानसभा निवडणुकीसाठी ते शहरातून उबाठा गटाचे उमेदवार राहू शकतात, अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत होती. मात्र उबाठातर्फे जयश्री महाजन यांना तिकिट मिळाले. मध्यंतरीच्या काळात ते उबाठा गटाला जय महाराष्ट्र करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर येवून ठेपले असतांना त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विष्णू भंगाळे यांच्या या पक्ष प्रवेशामुळे जळगाव शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. शिवाय आता निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजूमामा भोळे यांना देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे. कारण त्यांच्या सोबत युवकांची मोठी ताकद आहे. आज त्यांच्या सोबत युवा सेनेच्या शेकडो युवकांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, विष्णू भंगाळे यांच्या पक्षप्रवेशाआधी आमदार भोळे यांनी भंगाळे यांची भेट घेवून चर्चा केली होती.
अशी आहे विष्णू भंगाळे यांची राजकीय कारकीर्द
माजी महापौर विष्णू भंगाळे हे जळगाव शहरातील युवा चेहरा व आक्रमक विद्यार्थी नेते म्हणून ओळखले जातात. जळगाव महापालिकेत नगरसेवक, महापौर, कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भुषविली आहेत. विष्णू भंगाळे विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय झाले होते. एनएसयूआय संघटनेत काम करताना युवक कॉंग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर ते सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. महापालिका स्थायी समितीचे सभापतिपद तसेच जळगावचे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे. जम्परोप असोसिएशनचे महाराष्ट्राचे चेअरमन, ज्यूदो, फ्लोअर बॉल संघटनेचे सदस्य अशी अनेक पदे देखील त्यांनी भुषवली आहेत.