जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२४ । राज्यातील हवामानात पुन्हा बदल झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली असताना आज राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्याला पावसाचा अंदाज नसून तापमानात मात्र किंचित वाढ झालीय.
राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
उत्तर महाराष्ट्रात थंडीनं जोर धरलेला आहे. मात्र हवामान विभागाने आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जळगावात कसं असेल हवामान?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात रात्री आणि सकाळी थंडीचा काहीसा कडाका जाणवत आहे. मात्र दुपारनंतर उन्हाचे चटके बसत आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून सकाळी पूर्व दिशेकडून ११ किमी वेगाचे वारे वाहणार आहे. सकाळी ५० तर दुपारी ३३ टक्के आर्द्रता असेल.