जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२४ । राज्यामध्ये आता तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाल्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थंडी जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून तापमानात घसरण झाल्याने आज सोमवारपासून जळगाव शहरासह परिसरात पहाटे थंडीचा जोर वाढणार आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय?
उकाड्याने हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहत होते. पण यंदा उशिराने थंडी सुरू झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामान पुढचे काही दिवस कोरडे राहिल. तर पुढील ४ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने सांगितले. मराठवाडा आणि विदर्भात तापमानात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे राज्यातील सांगली, नाशिक, नागपूर आणि जळगावमध्ये तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडी वाढली आहे. जळगावमधील तापमानात हळूहळू घट होत असून, दोन दिवसांपूर्वी किमान तापमान १५.७ अंश होते. आता १५ अंशांची नोंद झाली आहे ते १५ नोव्हेंबरपर्यंत कायम राहील. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापमान १२ अंशांवर पोहोचू शकते असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
रविवारी शहरात कमाल तापमान ३३ तर किमान १५ अंश नोंदले गेले. दुपारी उन्हाचे चटके तर रात्री आणि पहाटे हुडहुडी जाणवत आहे. आज सोमवारपासून पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, ११ ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान किमान तापमानात एक-दोन अंशाने घट होण्याची शक्यता आहे.