जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२४ । ऐन दिवाळीत खाद्य तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी १०० रुपये किलोवर असलेले सोयाबीन तेल सध्या १४० रुपयांवर गेल्याने अनेकांचे किचन बजेट कोलमडले आहे.
दिवाळीच्या दोन दिवसापूर्वीच त्यात सरासरी ८ ते १० रुपये प्रतिकिलो वाढ झाल्याने १५ लिटरच्या जारमागे १५० ते २०० रुपये वाढले आहेत. ऐन दिवाळीत तेलाचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली. किमान दिवाळीनंतर भाव कमी होणे अपेक्षित होते. पण, अद्याप दर चढेच आहेत. दरम्यान, दिवाळीत सूर्यफुल, सोयाबीन या तेलाला सर्वाधिक मागणी असते. गेल्या महिन्यात या तेलाचे दर १०० रुपये किलोच्या दरम्यान होते. आता ते १४० रुपये किलोवर पोचले आहेत. तेलाच्या दरम्यान गुरुवार व शुक्रवारी म्हणजे दिवाळीच्या दिवशीही वाढ झाली. गेल्या पंधरवड्यात तेलाचे भाव एका किलोमागे तब्बल २५ ते ३० रुपयांनी वाढले आहेत.
सोयाबीन तेलाचे किरकोळ दर वाढून १४० पर्यंत
राइस ब्रान आणि सोयाबीन तेलाचा किरकोळ दर गेल्या महिन्यापूर्वी १०० ते १०५ रुपये प्रति लिटर होता. तो दर आता १३४ ते १४० रुपयांच्या घरात गेला आहे. तर १२० रुपयांचे सूर्यफूल तेल १४५ रुपये तर १६० ते १७० रुपयांचे शेंगदाणा तेल १९० ते १९५ रुपयांपर्यंत पोचले आहे. १५ किलो डब्यामागे सरासरी १५० ते २०० रुपये वाढले आहेत. यामुळे अनेकांनी दिवाळीत फराळ तयार करताना हात आखडता घेतला. विशेषतः गोरगरीब व मध्यमवर्गीयांनाया महागाईचा फटका बसला.
का वाढले खाद्यतेलाचे दर ?
केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करावर एकूण २२ रुपयांनी वाढ केली याचाच फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे. मात्र याचा सामना सर्वसामान्य ग्राहकांना करावा लागत आहे. कच्चे सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात एकूण २२ टक्के, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क एकूण ३५.७५ टक्के वाढवले आहे.