जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून अशातच दुचाकीला कट मारल्याने दुचाकीस्वार व कारमधील तरुणांमध्ये वाद झाला. या वादात एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील जळोद-अमळगाव शिवारात घडली. विकास प्रवीण पाटील (वय ३०) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमळनेर शहरातील अंकलेश्वर येथील विकास प्रवीण पाटील हा मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या मोटरसायकलला कार चालकाने कट मारला. यात दुचाकीचे इंडिकेटर तुटले. यामुळे कार चालक व दुचाकीवरील दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान अमळगाव- जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. त्यानंतर काही जणांनी लोखंडी रॉड, दांडके घेऊन आले. त्यात विकास पाटील हा पळत सुटला. मात्र त्याला गाठून संशयित आरोपींनी मारहाण करून त्याला बेदम मारहाण करत जीवे मारले. यानंतर तेथून पसार झाले. सदरची घटना ३ नोव्हेंबरला पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान मृत विकास पाटील याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहे. मात्र पोलिसांनी तपास करत एलसीबीच्या पथकाने जामनेर तालुक्यात तिघांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी अमोल वासुदेव कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, रोहित सीताराम पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव यांना जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.