मंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रचारात जोर, जळगाव तालुक्यात विकासकामांसाठी पाठिंबा
जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२४ । शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी भोकर पंचायत समिती गणातील अनेक गावांत प्रचाराची मोहिम उघडली. आमोदा खु., घार्डी, धानोरा खु., करंज, सावखेडा खु., किनोद, भादली खु., भोकर, पळसोद, जामोद, आमोदा बु. या भागांत त्यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत अबालवृद्ध, महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
मंत्री पाटील यांनी मागील कार्यकाळात या परिसरातील जनतेसाठी दिलेली वचने पूर्ण करताना, खेडी – भोकर पुलासाठी १५२ कोटींचा निधी मंजूर केला असून, युद्धपातळीवर पुलाचे काम सुरू केले आहे. यासोबतच, जळगाव – खेडी – भोकर – चोपडा रस्त्यांच्या रुंदीकरण व डांबरीकरणाची कामे हाती घेतल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी पाटील यांना “तुम्ही वचनपूर्ती करणारे नेते आहात,” असे गौरवोद्गार काढले व “आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत” अशी भावना व्यक्त केली.
भोकर येथील स्वामी समर्थ स्वाध्याय केंद्राच्या महिलांनी गुलाबराव पाटील यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. भोकर परिसरातील गावांमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात गुलाबराव पाटील यांचे घराघरात औक्षण आणि आरत्या करण्यात आल्या. या प्रचारमोहिमेत भाजपा, शिवसेना, रा.कॉ., आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.