जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२४ । मागील काही दिवसापासून सोनं -चांदी दरात वाढ होत असल्यामुळे आता ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना सोनं-चांदीचे दागिने खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे. दर कमी होण्याची अपेक्षा ग्राहकांना असताना मात्र दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. तुम्हीही आज सोने चांदी खरेदीला जात असाल तर भाव तपासून घ्या..
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्याही भावातही एक हजार ५०० रुपयांची वाढ झाली. यामुळे जळगावच्या सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले.तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७२,९७० रूपये होता. दुसरीकडे चांदीचा दर ९८ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. भाव वाढले तरी सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल होऊन धनत्रयोदशीच्या दिवशी जवळपास ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदीला मोठे महत्त्व आहे. यंदाही सुवर्ण बाजारात खरेदीचा मोठा उत्साह होता. एकीकडे धनत्रयोदशीच्या एक दिवस अगोदर सोने-चांदीच्या भावात घसरण झाली असताना महर्तावर दोन्ही धातूंचे भाव वाढले. आता दोन दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. यानंतर तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे.
मात्र यातच सोन्याची किंमत मागील सर्व रेकॉर्ड मोडित काढणार असल्याचे भाकित सराफ व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पितृ पंधरवाड्यापासून सोन्याने दरवाढ नोंदवली आहे. यामुळे दिवाळीत दागिने करण्यासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहे. मागील पंधरा दिवसात सोन्यात ३५०० ते ३८०० रुपयांनी तर चांदीत ७ हजार रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. भविष्यात नागरिकांना चढ्या दरात सोने, चांदीची खरेदी करावी लागणार आहे.