जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२४ । एकीकडे मान्सून पावसानं महाराष्ट्रातून काढता पाय घेतलेला असतानाच काही भागांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. दुपारनंतर उन्हाचा चटका बसत आहे. मात्र यातच हवामान खात्याने आज राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठे बदल होणार असून काही भागात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
आज शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्या देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील वाशीम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.
जळगावातही पावसाचा अंदाज?
दरम्यान, शुक्रवारी रात्री जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी पावसामुळे वेचणीवर आलेल्या कापसासह मका, कडधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज दुपारनंतर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यादरम्यान वारा आणि विजा होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घ्यावी.