जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२४ । राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असताना परतीच्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली. जळगाव जिल्ह्याला देखील गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. मागील दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेताच दुपारच्या तापमानात चार अंशांनी वाढ झाल्यामुळे उकाडा वाढला आहे. मात्र अशातच जळगाव जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
१७, १८ व २१ ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. २३ ऑक्टोबरपासून पहाटेच्या वातावरणातील तापमान घसरेल व गुलाबी थंडीचा काहीसा अनुभव सकाळच्या वातावरणात येईल; पण दुपारच्या वेळेत उकाडा जाणवेल हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला. आजही राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत सक्रिय आहे. कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे जाताना आणखी तीव्र होण्याची शक्यता असून यामुळे राज्यात पावसाचे सावट असणार आहे.
आज या भागात पावसाचा अंदाज?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पुणे आणि घाट परिसरातही हवामान अंशतः ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी. तसेच काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.