जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या राज्यासह जळगाव जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरु असून परिणामी कापूस खरेदी पुन्हा रखडली आहे. कापूस ओलसर असल्याने व्यापाऱ्यांनी कापूस घेणे बंद केले आहे. काही ठिकाणी पाऊस थांबला असला, तरी दर वाढण्यासाठी अजून आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एकीकडे पावसामुळे कापूस खरेदी थांबली असून दुसरीकडे शेतात उभ्या पिकावर किडी आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे. सध्या कापसात ओलावा अधिक असून, बाजारात सहा ते साडेसहा हजारांचा दर मिळत असल्याने तुरळक कापूस विक्रीसाठी येत आहे.
सणासुदीला पैशांची गरज असल्याने काही शेतकऱ्यांनी कमी भावातही कापसाची विक्री केली. चोपडा, यावल, जळगाव, पारोळा, एरंडोल या भागामध्ये शेतकऱ्यांकडे कापसाची आवक सुरू झाली आहे. मध्यंतरी दरात किंचित सुधारणा झाली. तेव्हा दर प्रतिक्विंटल साडेसात हजार रुपये होता. या दरात अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. यापेक्षा अधिकचे दर होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पुढील आठवड्यात आणखी वाढेल, असे संकेत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाची उघडीप मिळाल्यानंतर कापूस वेचणीला गती आली होती. यंदा चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची वाळवणूक करून बाजारात नेण्याची तयारी ठेवली होती; परंतु जिल्ह्यात गेल्या तीन, चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी, कापसात ओलावा आहे. ओलाव्यामुळे कापूस पिवळा होतो. त्याचा दर्जा घसरतो. त्याला पुढे भाव कमी मिळतो. त्यामुळे शेतकरी कापसाची साठवणूक करीत आहेत.