जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२४ । मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस आता जळगावसह राज्यात पुन्हा बरसणार आहे. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जळगाव जिल्ह्यात मंगळवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवारी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्ह्यात अतिवृष्टीचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. २४ ते २९ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. तो आता गुजरातमधील कच्छपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा पुढील काही तासात तयार होणार आहे. याच्या परिणामामुळे राज्यातील पाऊस वाढणार आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातदेखील पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
जळगावला अतिवृष्टीचा इशारा
जळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात मात्र सुरुवातीला पाऊस झाल्यांनतर गणेशोत्सव काळात व गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठराविक तालुक्यांमध्ये झाला. काल सायंकाळी जळगाव शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २५ नंतर पावसाचा जोर कमी होईल. मात्र, २९ पर्यंत ढगाळ वातावरण व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात राहणार आहे.
वातावरणात आर्द्रता वाढल्याने उकाड्यात वाढ
जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. जळगाव शहराच्या तापमानात देखील वाढ झाली असून, सोमवारी जळगाव शहराचा पारा ३४.८ अंशांवर पोहोचला होता. त्यात ढगाळ वातावरणदेखील कायम राहिल्यामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण ८३ टक्के झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. दरम्यान, आज मंगळवारी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पाऊस झाल्यानंतर उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. मात्र या पावसामुळे काढणीवर आलेला खरीप हंगामातील पिके खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.