जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२४ । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केलीय. यातच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये भाजपने मंत्री गिरीश महाजनांसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी सोपविली आहे.
महायुतीचे निवडणूक अभियान समन्वयक म्हणून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन काम पाहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे युवा संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपाच्या वतीने व्यवस्थापन समिती स्थापनेबाबत माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली
भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत १२५ जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने पक्षाची बूथपर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
विविध समित्यांचे प्रमुख
जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार
विशेष संपर्क – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे
महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर
कृषी क्षेत्र संपर्क – खा. अशोक चव्हाण
लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर
मीडिया- आ.अतुल भातखळकर
ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर
अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित
सोशल मीडिया – आ. निरंजन डावखरे
निवडणूक आयोग संपर्क- माजी खा. किरीट सोमय्या