जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । भुसावळ येथील रेल्वे स्थानकावर दोन संशयित तरुणांना त्यांच्याजवळील बॅगा लगेज स्कॅनरमध्ये तपासणीची सूचना करण्यात आली. यामुळे अवघ्या काही सेकंदात २५ वयोगटातील दोन तरुण त्यांच्या बॅगा सोडून पसार झाले. सुरक्षा यंत्रणेने सावधगिरीने बॅगांची तपासणी केल्यावर त्यात १ लाख ७० हजार रुपये किमतीचा १७ किलो गांजा सापडला.
रेल्वेच्या दर्शनी भागातील दक्षिण बाजूला मुसाफिर खान्याजवळ लगेज स्कॅनर मशीन लावले आहे. बुधवारी रात्री रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी. आर. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसएफ जवान वसंत बाविस्कर, आरपीएफ हवालदार नेरपगार हे कर्तव्यावर होते. यावेळी २५ वयोगटातील दोन तरुण स्थानकात येताना दिसले. हालचाली संशयास्पद वाटल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना बॅगा स्कॅनरमध्ये तपासणीची सूचना केली. दोघांनी बॅगा स्कॅनरमध्ये टाकल्या. यानंतर कर्मचारी तपासणी करत असल्याचे पाहून दोघांनी पलायन केले.
त्यामुळे यंत्रणेने या बॅगांची तपासणी केली. त्यात गांजा होता. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिराने आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीना यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण निकाळजे करत आहेत.