जळगाव जिल्हा
जळगाव जिल्ह्यातील येथे होणार राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२४ । जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र होणार आहे. त्याकरीता १५२ कोटीच्या खर्चाला गृह विभागाने १ ऑगस्ट रोजी मान्यता दिली आहे. त्यासोबतच १३८० पदे निर्माण होणार आहेत.
युती सरकार काळात जिल्ह्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले होते. भूमिपूजन होवून तो प्रस्ताव थंड बस्त्यात होता. सन २०२० मध्ये एका अध्यादेशाद्वारे हे केंद्र नगर जिल्ह्यातील जामखेड येथे करण्याचे जाहीर केले होते. आता गुरुवारी जामखेडबाबतचा प्रस्ताव रद्द करत गृहविभागाने हे केंद्र वरणगाव येथे करण्याचा आदेश काढला आहे. या केंद्रासाठी समादेशकासह विविध १३८० पदांना मान्यता देऊन साधनसामुग्री व कार्यालयीन खर्चासह १५२ कोटी २६ लाख २३ हजार ४०४ रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.